Bank Profile

वाई हे गाव सह्याद्रीच्या कुशीत वसलेले कृष्णाकाठचे एक छोटे टुमदार, शहर आणि खेडे यांच्या सीमेवर वसलेले गाव. महाबळेश्वर येथे कृष्णा नदी उगम पावून टी पूर्ववाहिनी झाल्यावर तिच्या काठावर वसलेले पहिले तीर्थक्षेत्र. या गावाला सुमारे २००० वर्षाचा ज्ञात इतिहास आहे.

भारतात १९ व्या शतकाच्या अखेरीस सहकारी चळवळीचा उगम झाला. सन १९८३ मध्ये | वाईतील काही तरुणांनी श्री. सुरेशराव कोरडे, श्री. शामराव कर्णे, के. बी. फरांदे, आनंदराव लोळे, रामचंद्र घोडके, बाबुराव खैरे, उत्तमराव इथापे इ.च्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन श्रमिक सहकारी पतसंस्थेची रीतसर स्थापना केली. विशेषत: समाजातील दुर्लक्षित व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना आर्थिक सहाय्य करण्याच्या भूमिकेतून त्यांनी पतसंस्थेचा पाया घातला. संस्थेची सुरुवात ९५३ सभासद आणि रू. ३२५०/- एवढ्या भागभांडवलावर झाली. सामान्य माणसासाठी सहकाराच्या माध्यमातून पतसंस्थेच्या रूपाने उभी राहिलेली ही संस्था अनेकांना आधार वाटली.

पतसंस्थेच्या नावात श्रमिक हा शब्द असल्याने ती केवळ कामगार, मजुरांची संस्था आहे असे समजले जाई. वस्तुत: संस्थेचे उद्दिष्ट व्यापक असे होते. समाजहिताचे दृष्टीने आणि सर्व समाजाला त्याचा लाभ व्हावा या हेतूने संस्थेचे नाव अधिक व्यापक करण्यात यावे अशी अपेक्षा अनेकांकडून व्यक्त होऊ लागली व दि. १३-०७-१९८९ रोजी जनता सहकारी पतसंस्था या नावाने संस्थेचे कामकाज सुरु झाले.

पतसंस्था वेगवेगळ्या आघाड्यांवर यशस्वीपणे संचार करीत होती. तिचे बँकेत रुपांतर करून आपला पाया अधिक बळकट करण्यासाठी व पतसंस्थेचे रुपांतर अर्बन को-ऑप बँकेत व्हावे यासाठी रिझर्व बँक ऑफ इंडियाकडे रीतसर प्रस्ताव पाठविण्यात आला दि. ०५-०३-१९९८ रोजी पतसंस्थेचे रूपांतर जनता अर्बन को-ऑप बँकेमध्ये झाले.

सध्या बँकेच्या एकूण ७ शाखा आणि मुख्य कार्यालय अशी वाटचाल सुरु आहे. आमच्या सर्व शाखा संगणीकृत असून CORE Banking झालेले आहे.